Ad will apear here
Next
स्त्रियांचे पारंपरिक खेळ
....

स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे. मंगळागौर आणि नागपंचमी हे सण त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 
..........
स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे आणि साहित्याचं, तसंच भाषेचं दालन समृद्ध केलं आहे. मंगळागौर आणि नागपंचमी हे सण त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. श्रावण हा श्रवणाचा महिना. जे सांगायचं ते सरळ न सांगता कहाणीच्या, गाण्यांच्या मिषानं ऐकवण्याची हुशारी, मनोरंजन तर आहेच; पण त्याचबरोबर बोध देणं, व्यवहार समजावणं आणि वळण लावणं असे अनेक उपहेतू या निमित्तानं खेळल्या जाणाऱ्या खेळांना आहेत.

या शोधनिबंधात पुण्याजवळच्या कात्रजच्या पुढील शिवापूर ते आंबवणे या गावातील स्त्रियांच्या खेळाचा आणि गाण्याचा अभ्यास मांडला आहे. हा निबंध हा प्रात्यक्षिकांवर बेतलेला आहे. या भूभागामध्ये मंगळागौरीच्या पूजेचा प्रघात नाही. मंगळागौरीला रात्री जागरण करून खेळ खेळण्याची पुण्या-मुंबईकडची प्रथा इथे फारशी प्रचलित नाही. याउलट नागपंचमीच्या सणालाच रात्री जमून गावातल्या सगळ्या स्त्रिया रात्रभर खेळ खेळतात. मंगळागौरीचे खेळ आणि हे नागपंचमीचे खेळ यातला सारखेपणा पाहून प्रश्न पडला, की असं का बरं असेल? या दोन्हींचा समान धागा काय असावा? तर मंगळागौरीच्या पारंपरिक कहाणीत त्याचे धागेदोरे मिळतात. ती कथा थोडक्यात अशी -

....निपुत्रिक वाण्याला गोसाव्याच्या सल्ल्याने पार्वतीच्या कृपाप्रसादाने आंबा मिळतो. तो खाऊन स्त्री गरोदर राहते. देवीच्या अटीप्रमाणे सुपुत्र होतो व त्याचे नाव शिव ठेवतात; पण तो अल्पायुषी असतो. म्हणून त्याचे लग्न करत नाहीत. शिवाचा मामा आणि तो हे दोघे अल्पायुष्याचे संकट निवारण्यासाठी काशीयात्रेला जातात. वाटेत सुशीला नावाची मुलगी मैत्रिणींबरोबर खेळत असते. त्यातील भांडणात एक मुलगी तिला वाईट बोलते. त्यावर सुशीला म्हणते, ‘माझ्या आईने मंगळागौरीचे व्रत केले आहे. मी तिची मुलगी असल्यामुळे मला तुझे बोलणे लागणार नाही आणि मी विधवा होणार नाही.’ हे ऐकून मामाला वाटते, की या मुलीशी आपल्या भाच्याचे लग्न झाल्यास त्याचे आयुष्य वाढेल. तसे लग्न होते. रात्री दोघे गौरीहरापाशी निजतात. मुलीच्या स्वप्नात मंगळागौर येते व सांगते, ‘मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता घड्यात दूध ठेव. सर्प घड्यात शिरला की चोळीने घड्याचे तोंड बांधून टाक आणि सकाळी त्या घड्याचे वाण आईला दे.’ ती त्याचप्रमाणे करते आणि त्या सर्पाचा सुवर्णहार झालेला असतो. सकाळी आईबाप मुलीला नवऱ्यासोबत खेळायला घेऊन येतात, असा उल्लेख येतो. पुढे नवऱ्याचे प्राण हरण करायला यमदूत आला असता, मंगळागौर त्याला आडवी येते आणि यमदूताला पळवून लावते.

मंगळागौरीच्या या कथेत नागपंचमीप्रमाणे नागाची पूजा केल्याचा उल्लेख आहे. सापाचा सुवर्णहार झाल्याचा उल्लेख आहे आणि तोच हार आईला वाण म्हणून दिला, असं सांगितलं आहे. म्हणूनच मंगळागौरीच्या निमित्ताने मुली आईला दागिना देत असाव्यात. त्याचबरोबर मुली खेळत असल्याचाही उल्लेख आहेच म्हणजे मुलींचे खेळ, नागाची पूजा या सगळ्याचे एकत्र आलेले उल्लेख या दोन्हींत पारंपरिकरीत्या कधीतरी काही समानता होती हे सूचित करतात, असे दिसते. बहुधा त्याला अनुसरूनच शिवापूर गुंजवणी खोऱ्यात हे खेळ मंगळागौरीला न खेळता नागपंचमीला खेळले जातात; पण तरीही त्यामध्ये त्याचं स्वत:चं वेगळेपण आहे. काही खेळ खास त्यांच्या भागातले आहेत. तर अनेक गाणीही वेगळी आहेत. खेळ खेळण्याच्या पद्धतीत वेगळेपणा आहे. या त्यांच्या वैशिष्ट्यांचा आढावा या शोधनिबंधात घेतला आहे.

सामान्यपणे स्त्रियांच्या पारंपरिक खेळातून ऋणानुबंधाची गोडी चाखायला मिळते. अनेक वेळा सासुरवाशिणी गीतांचा अमृतकुंभ रिता करतात. मानवी भावभावनांची, सगेसोयऱ्यांची, ऋणानुबंधांची चित्तवेधक चित्रे रेखाटलेली असतात. सासू-सासरे, नणंद यांविषयी विशेष राग, तर माहेर, आई, भाऊ, बहीण, वडील यांच्याबद्दलची आत्मीयता स्त्रिया मोकळेपणाने या गाण्यातून सांगतात. लेकी-सुना, चहाटळ मैत्रिणी असा सगळा गोतावळा या गीतांमधून सामोरा येतो. स्त्रियांच्या पारंपरिक खेळातून तत्कालीन सामाजिक मूल्ये, रीतीभाती, सवयी, दु:ख, वेदना यांचे यथायोग्य चित्र उमटते, तसेच सामाजिक परिस्थितीचे अचूक प्रतिबिंबही दिसते. एकप्रकारे हा स्त्रीवर्गाचा सांस्कृतिक वारसा आहे. काळजाला हात घालणाऱ्या कवयित्री आणि त्यांचं चिरतरुण काव्य - हे काव्य त्यांच्या रोजच्या आयुष्याचा पट मांडून दाखवते. सासर-माहेर ही दोन जिवाभावाची ठिकाणे; पण ती व्यवहाराची भीड मोडून ही गाणी बोलकी होतात. ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्या गुणदोषासंकट या शिवापूर गुंजवणी खोऱ्यातल्या गाण्यांमधून उमटतातच. डॉ. सरोजिनी बाबर यांनी अगदी योग्य शब्दांत याचं वर्णन केलं आहे. त्या या सृजनाला स्त्रियांचं वंशपरंपरागत धन म्हणतात.

...रामायण आणि महाभारत यांसारख्या आदिकाव्यांचा एक वेगळाच अनवट परिणाम या काव्यातून दिसतो. आजकालच्या सुशिक्षित, पांढरपेशा समाजात यातील कथाभाग, व्यक्तिरेखा फार ठाशीव स्वरूपात भिनल्या आहेत. त्यात जरासाही बदल या मंडळींना खपत नाही; मात्र ग्रामीण भागात यातल्या कथा, व्यक्तिरेखा एकरूप झाल्या आहेत आणि त्यामुळे, राम, सीता इत्यादी कथेतील, काव्यातील पात्रं त्यांच्या जणू रोजच्या जीवनातली माणसं आहेत. म्हणूनच की काय कोण जाणे, झिम्मा खेळताना आधी एकमेकींचे हात धरून ‘साई सुट्ट्यो’ म्हणायची पद्धत अनेक ठिकाणी आहे. इथल्या भूप्रदेशातल्या स्त्रिया ‘साई सुट्ट्यो’ म्हणून त्या पुढे म्हणतात - ‘रामाची बायको काळीकुट्ट’ असं म्हणताना त्यांना कोणताही ताण येत नाही. आपल्या एखाद्या मैत्रिणीची गंमत करावी तितक्या सहजतेने त्या आदिकाव्यातल्या प्रसिद्ध व्यक्तिरेखांची गंमत आपलेपणाने करताना दिसतात.

‘काथवट कणा’ या गीतात गाठोडं घातलं जातं. पायाचे दोन्ही अंगठे हातांनी पकडून जमिनीवर गोल गोल फिरणाऱ्या या बायका एखादं गाठोडं पाय लागल्यावर जसं गोल गोल फिरावं तशा दिसतात. या वैशिष्ट्यपूर्ण खेळात त्यांची लवचिकता पाहण्यासारखी असते. यात एका वेळेला दोघी जणी एकमेकींकडे पाठ करून बसतात आणि एकाच वेळेला गाठोडं घालायला लागतात. त्यामुळे दोघींनी एकाच गतीनं गाठोडं घालणं गरजेचं होतं. एकीचा वेग कमी झाला, तर दुसरी स्त्री तिच्यावर येऊन आपटते आणि पहिलीचं हसं होतं.

‘काथवट कणा गं, हिच्या पाठीचा गेलाय कणा गं, पाठीचा गेलाय कणा गं, हिला चौघीजणी सुना गं, हिला चौघीजणी सुना गं, हिला डॉक्टर कोणी आणा गं’
यामध्ये बदलत्या काळानुसार सासू-सुनांच्या नात्यात झालेला बदल टिपलेला दिसतो. चार-चार सुना असून हिचा कणा मोडलाय म्हणजे हिलाच काम करावं लागतं, असं यातून सुचवायचं असावं आणि चार सुना असून कोणीतरी डॉक्टरला आणा अशी विनवणी म्हणजेच सुनांचं होणारं दुर्लक्ष हा भाग चतुराईने सूचित केलेला आहे.
ताक घुसळण्याच्या रोजच्या कामाचंही सुंदर गाणं आणि खेळ या स्त्रिया खेळतात. यात एका स्त्रीच्या हातात उपरणं, पंचा असं काहीतरी असतं आणि ती दुसऱ्या स्त्रीच्या कमरेभोवती ते वळवून घेऊन त्याची दोन्ही टोकं हातात धरते आणि मोठ्या हंड्यातून ताक करताना रवीला बांधलेला दोर दोन्ही हातांनी जरा पुढे-मागे करावा तसा तो पंचा ती हलवते आणि अर्थातच जिच्या कमरेभोवती तो पंचा फिरत असतो ती ताकाची रवी असते. ती रवी कमरेभोवती उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरत असते. या खेळात खेळाचं म्हणून फार कौशल्य नसलं, तरी स्त्रियांच्या कलात्मक नवनिर्मितीचा उत्तम नमुना त्यातून दिसतो. 

....

अशा प्रकारे ताक करत असताना त्या गाणं म्हणतात – ‘ताक हाटीची हाटीची राई गवळण, तिच्या ताकात ताकात पडू मोगरा, ताक जायाचं जायाचं कानू नगरा.’ तान्हुल्या बाळाला - कान्हू कृष्णाला, म्हणजे ताक असल्यामुळे गवळण, कृष्ण, बाजारहाटीला जाणं हा पारंपरिक संदर्भ तर या गाण्यात येतोच; पण या खेळाचं सगळ्यात आकर्षण आहे ते याच्या शेवटात. गाणं दोन वेळा आळवून आळवून म्हटल्यानंतर खोचलेल्या पदरातून इतरांच्या नकळत रवी झालेली स्त्री कापसाचा पुंजका काढते आणि पोटापासून डोक्यापर्यंत हळूहळू नेते. रवीने ताक घुसळल्यावर लोणी वर यावं, अगदी तसाच लोण्याचा गोळा वर आल्यासारखा दिसतो.

....
या सर्व खेळांना गीताची जोड असली, तरी कुणालाच पेटी, तबला अशा वाद्यांची गरज पडत नाही. उलट टाळ्या, टिचक्या, तोंडाने काढलेला पकव्याचा आवाज अशा वेगवेगळ्या आवाजांनीच ताल धरला जातो. अशी दिंड मोडण्याचा खेळ खेळत असताना दोन्ही हातांनी एकमेकांवर आघात करत वेगळाच आवाज काढत नाद साधला जातो. अशा वेगवेगळ्या आवाजांची साथ, खेळांची गोडी आणखी वाढवते.

या खेळाचं आणि त्याबरोबर म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचं इतकं अतूट नातं आहे, की या स्त्रियांना नुसतं गाता किंवा गाणं न म्हणता नुसतं खेळता येत नाही. दोन्ही एकमेकांच्या जोडीनंच येतात, जणू ताल, ठेका, शब्द आणि सूर सगळे एकमेकांशी एकरूप पावतात. त्यामुळे या खेळांची, रात्र जागवण्याची गोडी आणखी वाढते. यातले बहुतांश खेळ दोघी, चौघी किंवा त्यापेक्षा जास्त जणींनी मिळून खेळायचे आहेत. एकमेकींसंगे खेळताना एकीनं दुसरीला सांभाळायचं, सावरायचं, तोल सांभाळायचा आणि एक-दुसरीच्या साथीनंच पुढे जायचं आहे.

...सारांश, खेळ खेळताना स्त्रियांनी किती गोष्टींचा त्यात मिलाफ साधलाय पाहा. एकीकडे लवचिकता, चपळता अशा शारीरिक क्षमता; पण एवढंच असेल तर ते मार्शल आर्टचे खेळ झाले असते. आपल्या बायकांनी त्यासोबत मनाचं गूज उकललं, ते शब्दात गुंफण्याची कला साधली आणि सुखदु:खाच्या चार गोष्टी मोकळेपणाने सांगण्याची कला या खेळाबरोबर साधली. परंपरेची मिरास असणारे हे स्त्रियांचे पारंपरिक खेळ तिच्या अंगभूत गुणांचे साक्षीदार आहेत, तसे तिच्या घडण्याचे आणि वाढण्याचेही साक्षीदार आहेत. भारताच्या ग्रामीण भागात अजून या परंपरा टिकून आहेत. काही प्रमाणात तिथल्या समाजजीवनात त्या रुळल्या आहेत, तरी ग्रामीण किशोरवयीन मुली त्यापासून लांब जाताना दिसत आहेत. बदलत्या काळातील आधुनिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे स्त्रियांची कामाची, विचार करण्याची मानसिकता बदलत आहे. तिच्या ठायी असलेली सहजसुंदर कला अभिव्यक्ती ती गमावते आहे. परकीय कल्पना, राहणीमान यांचा पगडा वाढतो आहे. अशा परिस्थितीत हा वारसा जपण्याची गरज अधिकच जाणवते आहे. या गीतांचे आणि खेळांचे जतन आणि संवर्धन करण्याचीही गरज आहेच.

- सुनीला संतोष गोंधळेकर

(हा लेख ‘पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे पारंपरिक देशी खेळ – प्राचीनत्व व महत्त्व’ या ग्रंथातील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महिलांचे खेळ, फुगडी, भातुकली, नृत्यगीते, हादगा-भोंडला अशा कित्येक प्रकारच्या पारंपरिक गोष्टींचे संकलन या ग्रंथात करण्यात आले आहे.  हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी http://www.bookganga.com/R/7M7XC या लिंकवर क्लिक करा. या ग्रंथाचे ‘संपादकीय’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZAVBE
Similar Posts
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
‘संस्कृती’ जपणाऱ्या ‘मंगळागौरी’ श्रावण आला की सोबत सणवारांची मोठी पलटणच घेऊन येतो आणि त्यासोबत नवा उत्साहही. मंगळागौरीचं व्रत आणि त्या वेळी खेळले जाणारे खेळ हादेखील असाच एक उत्साहाचा स्रोत. आपल्या मराठी संस्कृतीचा हा मोठा ठेवा तर आहेच, पण दुसरीकडे महिलांचं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य राखण्याचं कामही हे खेळ करतात. बदलत्या काळानुसार
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
प्रकाशपुत्र रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language